ढाका – तब्बल 17 हजार कोटी टका इतक्या प्रचंड रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी बांगलादेश पोलिसांच्या एलिट विंगच्या “रॅपिड ऍक्शन बटालियन’ने एक माजी मौलवी आणि ‘एहसान ग्रुप पिरोजपूर-बांगलादेश’ चा अध्यक्ष रकीब हसन यांना अटक केली.
रकीब हसनच्या एका निकटच्या सहकाऱ्यालाही यावेळी पोलिसांनी अटक केली. या दोघांबद्दल गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे, असे कायदेशीर आणि मीडिया विभागाचे संचालक “आरएबी’ कमांडर खोंडोकर अल मायिन यांनी शुक्रवारी वृत्तसंस्थेला सांगितले.
या योजनेच्या ग्राहकांकडून पैसे उकळल्यानंतर त्याने त्याच्या नावावर आणि नातेवाईकांच्या नावावर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 2008 मध्ये एक मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीची सुरुवात करून रकीब हसन यांनी एक रिअल इस्टेट कंपनी स्थापन केली होती.
ही कंपनी “शरियत कायद्या’अंतर्गत चालवण्याचा दावा रकीबसह इतर अनेकांनी केला होता. रकीब याने आपल्या व्यवसायाद्वारे लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली. त्यांच्याकडून गोळा केलेला पैसा अतिरेकी कारवायांना वित्तपुरवठा करण्यासाठी वापरला गेला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.