ढाका : इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस अर्थात इस्कॉन या कृष्णभक्तीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसार करणाऱ्या संघटनेवर बंदी घालण्यासाठी बांगलादेशात सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. इस्कॉन ही संघटना कट्टरवादी असून धार्मिक तेढ वाढवण्याच्या कार्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवून एका वकिलाने न्यायालयात इस्कॉनवरील बंदीची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
मात्र बांगलादेश नॅशनल हिंदू ग्रॅन्ड अलायन्स या हिंदूंच्या संघटनांच्या मंचाने या याचिकेला तीव्र विरोध केला आहे. इस्कॉन ही शांततामय संघटना असून गरिबांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे, असे या मंचाने म्हटले आहे. कालच इस्कॉनच्या चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यांना जामीन नाकारून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती.
यावेळी दास यांच्या अनुयायांनी काढलेल्या निषेध मोर्चावर पोलिसांनी लाठीमारही केला होता. दास यांच्या सुटकेची मागणी केली जात असतानाच इस्कॉनवर बंदी घालण्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली. मात्र या संदर्भात न्यायालयाने आदेश देऊ नये. याविषयी सरकार धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे इस्कॉनवर बांगलादेश सरकारच बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.
बांगलादेश सरकारचे स्पष्टिकरण
चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेबाबत बांगलादेश सरकारने स्पष्टिकरण दिले आहे. या अटकेबाबत काही गटांकडून चुकीचे विश्लेषण केले जात आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दास यांच्यावर काही विशिष्ठ आरोप ठेवून त्यांना अटक केली गेलेली आहे. त्यांच्या अटकेला राजकीय रंग देत भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असे बांगलादेश सरकारने म्हटले आहे.
दास यांच्या अटकेनंतर भारताने बांगलादेशमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण केले जावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. मात्र सर्व धर्मांप्रती बांगलादेशमध्ये सद्भावना असल्याकडे भारताकडून दुर्लक्षिले जात असल्याचेही बंगलादेशने म्हटले आहे.