#CWC19 : रोहितचे दमदार शतक; बांगलादेशसमोर 315 धावांचे आव्हान

बर्मिंगहॅम – सलामीवीर रोहित शर्माची दमदार शतकी तर के एल राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशसमोर 315 धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 बाद 314 धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.

भारतीय संघाची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल.राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 180 धावांची भागिदारी केली. भारताची धावसंख्या 180 असताना 29.2 षटकांत सौम्य सरकार यांनी रोहितला बाद केले. त्यानंतर लगेचच के.एल.राहुलला रूबेल हुसेन याने माघारी धाडले. के.एल. राहुलने 92 चेंडूत 77 धावा केल्या.

रोहितचे स्पर्धेतील चौथे शतक

आजच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार खेळी करत विश्वचषक स्पर्धेतील चौथे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 26 वे शतक साजरे केले. रोहितने 90 चेंडूत 100 धावा करत आपले शतक पूर्ण केले. रोहित शर्मा याला सौम्य सरकार याने बाद केले. रोहित शर्माने 92 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 104 धावा केल्या.

 

त्यानंतर ठराविक अंतरावर भारतीय संघाच्या विकेट पडत गेल्या. हार्दिक पांड्याकडून मोठ्या खेळाची अपेक्षा होती, मात्र त्याला मुस्तफिजुर रहमान याने शून्यावर बाद करत माघारी धाडले. याशिवाय भारतीय फलंदाजीत विराट कोहलीने 26(27), ऋषभ पंतने 48(41) आणि एम.एस. धोनी याने 35(33) धावा केल्या. केदार जाधवच्या जागी संघात स्थान दिलेल्या दिनेश कार्तिकसुध्दा अपयशी ठरला. कार्तिकने 9 चेंडूत केवळ 8 धावा केल्या.

बांगलादेश संघाकडून मुस्ताफिजुर रहमान याने 10 षटकांत 59 धावा देत 5 गडी बाद केले. तर शाकिब अल हसन, रूबेल हुसैन आणि सौम्य सरकार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दरम्यान, भारताने आतापर्यंत बांगलादेशविरूद्ध 36 सामन्यांपैकी 29 सामने जिंकले असून 5 सामन्यांमध्ये त्यांना बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. साहजिकच बांगलादेशचे खेळाडू येथे चांगली झुंज देतील असा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.