ढाका – बांगलादेशच्या नॅशनल पॉवर ग्रीड “फेल’ झाल्यामुळे देसातील बहुतेक भागात आज अंधार पसरला होता. देसाच्या पूर्व भागात कोठेतरी वीज बपुरवठ्यामध्ये बिगाड झाला होता, असे बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने सांगितले.
वीज वितरणातील तांत्रिक बिघाडामुळे देशातील सर्व वीज निर्मिती प्रकल्प बंद पडले आणि राजधानी ढाका आणि अन्य महत्वाच्या शहरांमधील वीज पुरवठा खंडीत झाला, असे उर्जा विभागाचे प्रवक्ते शमीम हसन यांनी सांगितले.
हा तांत्रिक बिघाड नक्की कोठे आणि का झाला आहे, हे शोधण्याचा प्रयत्न इंजिनिअर करत आहेत. ते शोधल्यानंतर त्याची दुरुस्ती केली जाईल. त्यामुळे आणखीन काही तास वीज पुन्हा उपलब्ध होऊ शकणार नाही, असेही या प्रवक्त्याने सांगितले.
बांगलादेशात सध्या आर्थिक संकटामुळे वीज निर्मितीवर टांगती तलवार आहे. सरकारने अलिकडेच डिझेलवर चालणाऱ्या उर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम थांबवले आहे. इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. डिझेलवरील उर्जा निर्मिती देशातील 6 टक्के वीज निर्मिती केली जाते. मात्र हे प्रकल्प बंद केल्यामुळे 1,500 मेगावॅट वीजेचे उत्पादन घटले आहे.