ढाका – बांगलादेशातील हंगामी सरकारमधील सल्लागार मंडळाचे खातेवाटप करण्यात आले आहे. हंगामी पंतप्रधान डॉ. मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी या सल्लागारांचे खातेवाटप जाहीर केले. स्वतः डॉ. युनूस यांच्याकडे संरक्षण खात्याबरोबर अन्य २७ खात्यांची जबाबदारी असणार आहे. माजी परराष्ट्र सचिव मोहम्मद तौहिद हुसैन यांच्यकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
डॉ. मोहम्मद युनूस यांना हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून गुरुवारी शपथ देण्यात आली. त्यांना देशाचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले असून हे पद पंतप्रधानपदाच्या बरोबरीचे आहे. अन्य सल्लागारांची निवड विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, लष्कर आणि नागरी समुदायाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून करण्यात आली आहे.
डॉ. युनूस यांच्याकडे संरक्षण, सामान्य प्रशासन, शिक्षण, उर्जा, अन्न, जलस्रोत आणि माहीती मंत्रालयांची जबाबदारी असणार आहे. तर लष्करातील निवृत्त ब्रिगेडिअर एम सखवात हुसैन यांच्याकडे गृह खाते सोपवण्यात आले आहे. हुसेन हे २००१ ते २००५ पर्यंत कोलकात्यात बांगलादेशचे उपउच्चायुक्त होते आणि २००६ ते २००९ पर्यंत बांगलादेशचे परराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत होते. बांगलादेश बँकेचे माजी गव्हर्नर सलाहुद्दीन अहमद यांच्याकडे वित्त आणि नियोजन मंत्रालयांचा कार्यभार असेल. माजी ऍटर्नी जनरल ए एफ हसन आरिफ हे स्थानिक सरकार मंत्रालयाचे काम पाहतील.
भेदभावविरोधी विद्यार्थी चळवळीच्या दोन समनवयकांना देखील हंगामी सरकारमध्ये सामील केले गेले आहे. त्यांच्याकडे दूरसंचार, माहीती तंत्रज्ञान आणि युवा, क्रीडा मंत्रालय सोपवण्यात आले आहे.
सल्लागर मंडळातील सार्वजनिक समुदायाचे तीन प्रतिनिधी गुरुवारी अध्यक्षांच्या प्रासादामध्ये झालेल्या समारंभात शपथ घेऊ शकले नव्हते. शपथविधीच्यावेळी ते राजधानी ढाक्यामध्ये उपस्थित नव्हते. उर्वरित २७ खात्यांची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे.