ढाका – बांगलादेशमध्ये हिंदू समुदायावरील सुरू असलेल्या हल्ल्यांचा, शिक्षकांच्या हत्यांचा आणि हिंदु महिलांवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी, शुक्रवारी चितगावमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
हिंदू संवाद या स्थानिक प्रसारमाध्यमांने या संबंधात ट्विटरवर सांगितले की, “नराइल सहापारा येथे हिंदूंवर झालेल्या रानटी कट्टरपंथी जिहादी हल्ल्याच्या निषेधार्थ शाहबाग आणि देशभरातील विविध हिंदू संघटनांकडून शांततेत निदर्शने करण्यात आली. बांगलादेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या कृत्याची दखल घेत हिंदुंवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे.
या धर्मनिरपेक्ष देशात कोणत्याही धर्माच्या विरोधातील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही असा इशाराहीं मानवाधिकार आयोगाने दिला आहे. सहापारा येथे हिंदुंवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करण्याचा आदेश या आयोगाने देशाच्या गृहमंत्रालयाला दिला आहे.
डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, 15 जुलै रोजी लोहागरा, नरेल येथील सहापारा भागात हिंदू अल्पसंख्याकांची घरे जाळण्यात आली. जमावाने शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर हिंदुंच्या घरावर हल्ला चढवला, एका व्यक्तीने फेसबुकवर मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा काहींचा आरोप आहे. ही पोस्ट टाकणारा युवक 18 वर्षीय असून त्याला त्वरीत अटक करावी अशी मागणी स्थानिकांनीं केली आहे.