बांगलादेशचा भारतावर निसटता विजय

बिलेरिके – उत्कंठापूर्ण लढतीत बांगलादेशच्या 19 वर्षाखालील संघाने भारताच्या 19 वर्षाखालील संघाचा तीन चेंडू व दोन गडी राखून पराभव केला. या विजयासह बांगलादेशने तीन देशांच्या तिरंगी क्रिकेट स्पर्धेत आघाडीस्थान घेतले आहे.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 36 षटकांत 5 बाद 221 धावा केल्या. त्यामध्ये ध्रुव ज्युरेल व प्रज्ञेश कनपिल्लेवार यांच्या शैलीदार अर्धशतकांचा समावेश होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना सुरू होण्यास विलंब झाला. त्यामुळे भारतास 36 षटके देण्यात आली. पुन्हा पावसाचा व्यत्यय आल्यानंतर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार बांगलादेशपुढे 32 षटकांत 218 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. त्यांनी 31.3 षटकांत विजय मिळविला. त्याचे श्रेय परवेझ इमान व अकबर अली यांच्या दमदार खेळास द्यावे लागेल. बांगलादेशचे 5 सामन्यांअखेर 7 गुण झाले आहेत. भारताने तेवढ्याच सामन्यांमध्ये 5 गुण मिळवित दुसरे स्थान घेतले आहे. इंग्लंडने 4 सामन्यांअखेर 2 गुणांची कमाई केली आहे.

भारताच्या कामरान इक्‍बालने 7 चौकारांसह 44 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर ज्युरेल व कनपिल्लेवार यांनी तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. ज्युरेलने 70 धावा करताना 6 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली तर कनपिल्लेवारने 5 चौकारांसह 53 धावा केल्या. समीर रिझवीने नाबाद 21 धावा करीत संघाच्या धावसंख्येस हातभार लावला. बांगलादेशकडून झिरीफुल इस्लामने दोन विकेट्‌स घेतल्या.

बांगलादेशकडून मोठी भागीदारी झाली नाही तरीही त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी चमकदार खेळ करीत संघाचा विजय दृष्टिपथात आणला. त्यांच्या परवेझने 6 चौकार व एक षटकारासह 51 धावा केल्या. अकबरने नाबाद 49 धावा करताना 5 चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. शमीम हुसेन (22) व तौहिद ह्रदय (30) यांनी उल्लेखनीय खेळ करीत संघास विजयश्री मिळविण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. भारताकडून सुशांत मिश्राने तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक –

भारत 36 षटकांत 5 बाद 221 (कामरान इक्‍बाल 44, ध्रुव ज्युरेल 70, प्रज्ञेश कनपिल्लेवार 53, समीर रिझवी नाबाद 21, झिरीफुल इस्लाम 2-49) बांगलादेश 31.3 षटकांत 8 बाद 219 (परवेझ इमान 51, अकबर अली नाबाद 49, तौहिद ह्रदय 30, शमीम हुसेन 22, सुशांत मिश्रा 3-47, पूर्णांक त्यागी 2-47, रवी बिश्‍नोई 2-25) (डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 32 षटकांत 218 धावांचे लक्ष्य)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.