#CWC19 : बांगलादेशचा वेस्ट इंडिजला दणका

टॉंटन – शकीब अल हसन याचे शैलीदार शतक व लिट्टन दास याची झंझावती टोलेबाजी यामुळेच बांगलादेशने वेस्ट इंडिजवर सनसनाटी विजय मिळविला. त्यांनी 322 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत व तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

बांगलादेशच्या तमिम इक्‍बाल (48) व सौम्या सरकार (29) यांनी 52 धावांची सलामी करीत चांगली सुरुवात केली. मात्र त्यांच्यापाठोपाठ मुशफीकर रहीम (1) हा बाद झाल्यामुळे त्यांचा डाव अडचणीत सापडला. या स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या शकीब याने लिट्टन दास याच्या साथीत धडाकेबाज खेळ करीत विंडीजची गोलंदाजी फोडून काढली आणि अवघड वाटणारे लक्ष्य दृष्टिपथात आणले. शकीब याने या स्पर्धेतील लागोपाठ दुसरे शतक टोलविले. त्याने 99 चेडूंमध्ये 16 चौकारांसह नाबाद 124 धावा केल्या. दास याने आक्रमक फटकेबाजी केली. त्याने आठ चौकार व चार षटकारांसह नाबाद 94 धावा केल्या. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 22.3 षटकांत 189 धावांची भागीदारी केली.

दरम्यान,शाय होप याचे शतक चार धावांनी हुकले. मात्र त्याने एल्विन लुईस व शिमोरन हेटमेयर यांच्या साथीत केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर वेस्ट इंडिजला बांगलादेशपुढे 322 धावांचे आव्हान ठेवता आले. वेस्ट इंडिजने 50 षटकांमध्ये 8 बाद 321 धावा केल्या.

लुईस व होप यांनी आक्रमक खेळ करीत दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. लुईस याने 67 चेडूंमध्ये 70 धावा केल्या. त्याने सहा चौकार व दोन षटकार अशी फटकेबाजी केली. होप याने 121 चेडूंमध्ये 96 धावा केल्या. त्यामध्ये त्याने केवळ चार चौकार व एक षटकार मारला. हेटमेयर याने चार चौकार व तीन षटकारांसह 50 धावा केल्या. जेसन होल्डर याने चार चौकार व दोन षटकारांसह 33 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

वेस्ट इंडिज 50 षटकांत 8 बाद 321 (एल्विन लुईस 70, शाय होप 96, शिमोरन हेटमेयर 50, जेसन होल्डर 33, मोहम्मद सैफुद्दिन 3-72, मुस्ताफिझूर रेहमान 3-59, शकीब अल हसन 2-54) बांगलादेश 41.3 षटकांत 3 बाद 322 (तमिम इक्‍बाल 48, सौम्या सरकार 29, शकीब अल हसन नाबाद 124, लिट्टन दास नाबाद 94)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)