बांगलादेशची विजयी सलामी

अध्यक्षीय संघावर पाच गडी राखून विजय

कोलंबो – श्रीलंकेच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाने श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षीय संघावर पाच गडी राखून विजय मिळविला आणि शानदार सलामी केली. त्यांच्या मोहम्मद मिथुनचे शतक केवळ नऊ धावांनी हुकले. मात्र, त्याच्या शैलीदार खेळामुळेच त्यांना हा सामना जिंकता आला.

अध्यक्षीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 285 धावांपर्यंत मजल गाठली. त्यामध्ये दासुन शनाका (86) व शिहान जयसूर्या (56) यांच्या आक्रमक खेळाचा समावेश होता. बांगलादेशने हे लक्ष्य 48.1 षटकांत व पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. त्याचे श्रेय मिथुनच्या झंझावाती 91 धावा तसेच मुशफिकर रहीम याच्या अर्धशतकास द्यावे लागेल. बांगलादेश व श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दिनांक 26 जुलै रोजी होणार आहे.

अध्यक्षीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी पहिले तीन मोहरे अवघ्या 32 धावांमध्ये गमावले. परंतु जयसूर्याने भानुका राजपक्ष याच्या साथीत चौथ्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. राजपक्षने दमदार 32 धावा केल्या. जयसूर्याने 5 चौकारांसह 56 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर पुन्हा त्यांची 5 बाद 127 अशी घसरगुंडी उडाली. शनाकाने त्यानंतर खेळाची सूत्रे हातात घेत चौफेर फटकेबाजी केली. त्याने 63 चेडूंमध्ये 86 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 6 चौकार व 6 षटकार अशी टोलेबाजी केली. वानिंदु हसरंगाने 3 चौकार व एक षटकारासह 28 धावा केल्या. या दोघांच्या आक्रमक खेळामुळेच अध्यक्षीय संघास पावणेतीनशे धावांपलीकडे पोहोचता आले. बांगलादेशकडून रुबेल हुसेन व सौम्या सरकार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

विश्‍वचषक गाजविणारा डाबखुरा फलंदाज शकीब अल हसन याने या दौऱ्यात भाग घेतलेला नाही. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळतो याचीच उत्सुकता होती. सलामीवीर तमिम इक्‍बालने दमदार 37 धावा करीत समाधानकारक सुरुवात केली. शकीबच्या जागी खेळणाऱ्या मिथुनने आश्‍वासक खेळ केला. त्याने रहीमच्या साथीत 73 धावांची भागीदारी केली. रहीमने आत्मविश्‍वासाने खेळ करीत 6 चौकार व एक षटकारासह 50 धावा केल्या.

रहीमच्या जागी आलेल्या मोहम्मदुल्लाहने मिथुनला चांगली साथ दिली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. मोहम्मदुल्लाहने चमकदार खेळ करीत 33 धावा केल्या. मिथुनने 100 चेडूंमध्ये 11 चौकार व एक षटकारासह 91 धावा केल्या. तो बाद झाला त्यावेळी बांगलादेशला विजयासाठी आणखी 21 धावांची गरज होती. सब्बीर रेहमानने नाबाद 31 धावा करीत संघाच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केले. अध्यक्षीय संघाकडून लाहिरू कुमाराने दोन विकेट्‌स घेतल्या. या सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी नऊ खेळाडूंना गोलंदाजी करण्याची संधी दिली.

संक्षिप्त धावफलक-

अध्यक्षीय संघ 50 षटकांत 8 बाद 282 (दासून शनाका 86, शिहान जयसूर्या 56, वानिंदु हसरंगा 28, रुबेल हुसेन 2-31, सौम्या सरकार 2-29)
बांगलादेश 48.1 षटकांत 5 बाद 285 (मोहम्मद मिथुन 91, मुशफिकर रहीम 50, तमिम इक्‍बाल 37, मोहम्मदुल्लाह 33, सब्बीर रेहमान नाबाद 31, लाहिरू कुमारा 2-26)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)