West Indies vs Bangladesh ODI Series | बांगलादेश सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे, जिथे 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर 8 डिसेंबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. यासाठी बांगलादेशने आपल्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाला नवा कर्णधारही मिळाला आहे. वनडे मालिकेत नियमित कर्णधार नजमुल हुसेन शांतोच्या अनुपस्थितीत बोर्डाने मेहदी हसन मिराजकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे.
मुशफिकर रहीम आणि नझमुल हुसेन शांतो आगामी एकदिवसीय मालिका खेळणार नाहीत. दोन्ही खेळाडू अद्याप तंदुरुस्त नसून दुखापतीतून सावरत आहेत. तौहीद ह्रदोयही फुटबॉल खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “नजमुल हुसेन शांतो अजूनही पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू मेहदी हसन मिराज प्रथमच एकदिवसीय सामन्यात बांगलादेशचे नेतृत्व करणार आहे.”
याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास, परवेझ हुसैन आणि हसन महमूद यांचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. हे खेळाडू बऱ्याच दिवसांनी वनडे खेळणार आहेत. याशिवाय एकदिवसीय मालिकेसाठी मुस्तफिजुर रहमानचीही निवड झालेली नाही. तो बाप होणार असून रजेवर आहे. खराब फॉर्ममुळे झाकीर हसनला स्थान मिळालेले नाही. आता मिराज नझमुलच्या जागी वनडे फॉरमॅटमध्ये प्रथमच कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे.
कसा आहे दौरा…
बांगलादेशचा वेस्ट इंडिज दौरा आतापर्यंत फारसा प्रेक्षणीय राहिलेला नाही. बांगलादेशला पहिल्या कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. वेस्ट इंडिजने हा सामना 201 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. तर दुसरा कसोटी सामना 30 नोव्हेंबरपासून खेळवला जात आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 8 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, दुसरा सामना 10 डिसेंबरला तर शेवटचा सामना 12 डिसेंबरला होणार आहे. या मालिकेनंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 16 डिसेंबरला, दुसरा सामना 18 डिसेंबरला तर शेवटचा सामना 20 डिसेंबरला होणार आहे.
🏏 Bangladesh Squad for the 3-match ODI Series Against West Indies. All matches are set to take place in St. Kitts. The series kicks off with the first ODI on December 8.#BCB #Cricket #Bangladesh #WIvBAN pic.twitter.com/O4y5zyHRLG
— Bangladesh Cricket (@BCBtigers) December 2, 2024
एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश संघ : मेहदी हसन मिराज (कर्णधार), लिट्टन कुमेर दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन तमीम, सौम्या सरकार, परवेज हुसैन इमोन, मोहम्मद महमूदुल्लाह, जेकर अली अनिक, अफीफ हुसैन ध्रुबो, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, हसन महमूद, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, नाहिद राणा.