दुबई – श्रीकर भरत व ग्लेन मॅक्सवेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सला 7 गडी राखून पराभूत केले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या लढतीत श्रीकर भरतने षटकार फटकावला व बेंगळुरूचा विजय साकार केला.
दिल्लीने विजयासाठी दिलेले आव्हान बेंगळुरूने 20 षटकांत 3 बाद 166 धावा करत पार केले व फ्लेऑफमधील संघांच्या स्थानांवरही परिणाम केला. बेंगळुरूचा डाव सुरु झाल्यावर कर्णधार सलामीवीर विराट कोहली व देवदत्त पडीक्कल यांनी साफ निराशा केली. हे दोघे बाद झाले तेव्हा संघाच्या केवळ 6 धावा झाल्या होत्या. त्यानंतर श्रीकर भरतने एबी डिविलियर्सच्या साथीत संघाचा डाव सावरला.
डिविलियर्स भरात आला असे वाटत असतानाच 26 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार फटकावून 26 धावांवर बाद झाला. त्याचवेळी ग्लेन मॅक्सवेलने भरतला साथ देत संघाचा डाव तर सावरलाच पण दिल्लीच्या गोलंदाजीवर तुफानी आक्रमण केले. हा सामना सहज जिंकतील असे वाटत असतानाच दिल्लीच्या गोलंदाजांनी धावांवर नियंत्रण राखत सामना रंगतदार अवस्थेत आणला. त्यावेळी अखेरच्या षटकांत त्यांना आवश्यक असलेल्या 16 धावाही बेंगळुरूने सहज केल्या. अखेरच्या चेंडूवर भरतने षटकार फटकावून संघाचा विजय साकार केला. दिल्लीकडून अनरीच नोर्जेने सर्वाधिक 2 गडी बाद केले. अक्सर पटेलने 1 गडी बाद केला.
पृथ्वी शॉ, शिखर धवन व शेमरन हेटमायर यांच्या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूसमोर विजयासाठी 165 धावा करण्याचे आव्हान ठेवले.
या सामन्यात बेंगळुरूच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी दिल्लीच्या आक्रमक फलंदाजांवर दडपण राखल्याने त्यांना द्विशतकी मजल मारता आली नाही.
बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर शॉ व धवन यांनी 88 धावांची सलामी दिली. मात्र, 11 व्या षटकात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर धवन 35 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 43 धावा करुन बाद झाला. धवन पाठोपाठ पृथ्वी शॉ देखील परतला.
त्याने 35 चेंडूत 48 धावांची खेळी करताना 4 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतही अपयशी ठरला. सातत्यपूर्ण खेळीसाठी प्रसिद्ध असलेला श्रेयस अय्यरही 18 चेंडूत 18 धावा करत तंबूत परतला. त्याचवेळी हेटमायर 22 चेंडूत 29 धावा करत संघाला दीडशतकी मजल मारुन दिली.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 164 धावा. (पृथ्वी शॉ 48, शिखऱ धवन 43, शेमरन हेटमायर 29, महंमद सिराज 2-25, डॅनियल ख्रिस्तियन 1-19, हर्षल पटेल 1-34, यजुवेंद्र चहल 1-34). रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 3 बाद 166 धावा. (एबी डिविलियर्स 26, श्रीकर भरत नाबाद 78, ग्लेन मॅक्सवेल नाबाद 51, अनरीच नोर्जे 2-24, अक्सर पटेल 1-39).