Baner Land Scam – जिवंत महिलेला कागदोपत्री मृत दाखवून त्यांची जमीन हडपण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी नोंदीत बदल केले होते. मात्र, कुटुंबीय वेळेत सतर्क झाल्यामुळे हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मृणालिनी संजय निकम (५२, रा. पाषाण) यांनी बाणेर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सविता दत्तात्रय सोमवंशी, शैलेश राठोड आणि दत्तात्रय संभाजीराव शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२४ ते १७ एप्रिल २०२६ दरम्यान घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निकम यांच्या वडिलांनी १९८८ मध्ये वेस्ट पोर्ट, बाणेरजवळ सुमारे ४३० चौरस मीटर जमीन त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केली होती. तक्रारदार यांच्या आईने वयोमान आणि आजारपणामुळे या जागेची पॉवर ऑफ अटर्नी तक्रारदारांच्या नावावर केली होती. तक्रारदार हा प्लॉट विकसित करणार होते. यासाठी एप्रिल २०२६ मध्ये विकासाचा करारही केला होता. दरम्यान, जमिनीशी संबंधित माहिती सरकारी पोर्टलवर तपासली असता, जमिनीच्या नोंदीमध्ये दुसऱ्याच एका महिलेचे नाव नोंदविल्याचे आढळले. त्यामुळे तक्रारदारांनी कर्वेनगर येथील अप्पर सर्कल कार्यालयात जाऊन चौकशी केल्यानंतर जमिनीवर कब्जा करण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे उघड झाले. सविता सोमवंशी यांनी ई-हक्क प्रणालीमध्ये फेरफार करून जमीन आपल्या नावावर करण्यासाठी अर्ज केला होता. तक्रारदार यांची आई जिवंत असताना मयत असल्याचे दाखवून बनावट मृत्यू दाखला तयार करण्यात आला. वारस प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रेही बनावट तयार करून शैलेश राठोडमार्फत तहसील कार्यालयात जमिनीच्या नोंदीत फेरफार करून मालकीच्या नोंदीत बदल केला. शिवाय वारस म्हणून स्वतःचे नाव नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली. दत्तात्रय शिंदे यांनी तक्रारदारांच्या आईच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर करत आहेत.