बांदा (उत्तर प्रदेश) – बांदा जिल्ह्याच्या कलेक्टर अनुराग पटेल यांनी आज निवृत्त होत असणारे त्यांच्या गाडीवरील चालक इम्तियाजुद्दीन खान उर्फ मुख्तार यांना अशी काही भावनिक भेट दिली की, मुख्तार यांच्या डोळ्यात पाणी आले आणि इतक्या वर्षांची नोकरी सार्थकी लागल्याची भावना त्यांच्या मनात तयार झाली.
मुख्तार हे जिल्हाधिकारी कार्यालयात चालक म्हणून नोकरीस होते आणि बांदा येथे बदली होऊन आलेल्या जवळपास 24 जिल्हाधिकाऱ्यांच्या कारचे त्यांनी सारथ्य केले आहे. 30 एप्रिल 2022 हा त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे ते कलेक्टरांच्या घरी जाऊन त्यांना कारमधून कार्यालयात घेऊन आले. दिवसभराची नोकरी संपवून जेव्हा ते घरी निघाले तेव्हा कलेक्टर पटेल यांनी त्यांना थांबवले. त्यांचा निवृत्तीचा दिवस अविस्मरणीय व्हावा म्हणून गाडीच्या चालकाच्या सीटवर स्वतः कलेक्टर बसले आणि चालकाला शेजारी बसण्यास सांगितले. त्यावर संकोचाने त्यांनी बसण्यास नकार दिला. पण पटेल यांनी अतिशय आग्रहपूर्वक आदेश दिल्याने ते त्यांच्या शेजारी बसले. नंतर कलेक्टर स्वतः कार चालवत मुख्तार यांना घरी सोडून आले.
त्याआधी संध्याकाळी मुख्तार यांच्या निवृत्तीनिमित्त कार्यालयाता छोटेखानी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कलेक्टर अनुराग पटेल यांच्या हस्ते शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. भविष्यातील वाटचालीसाठी मुख्तार यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना गाडीत शेजारी बसण्याची विनंती केली तेव्हा ते संकोचले. साहेब गाडी चालवणार आणि आपण त्यांच्या शेजारी बसणार हे त्यांच्या मनाला पटत नव्हते. मात्र, साहेबांनी आग्रह केल्याने ते शेजारी बसले. नंतर जिल्हाधिकारी त्यांच्या चालकाला घरी सोडून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीने कार्यालयातील सगळ्यांचेचे डोळे पाणवले आणि सगळे भावूक झाले. त्यांच्या या कृतीची सगळीकडे चर्चा झाली.
यावर मुख्तार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, निवृत्तीनंतरही मला जो सन्मान मिळाला तो माझ्या कायम आठवणीत राहिल. साहेबांनी मला गाडीत शेजारी बसवून घरी सोडले, माझा सन्मान केला, त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे.