ढाका – भारत विरुद्ध बांगलादेश एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज ढाका येथील शेर ए बंगला स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला बांगलादेशकडून एक विकेटच्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. भारताने हा सामना गमावल्यास बांगलादेश या मालिकेत विजयी आघाडी घेईल. सामान्यांच्या सुरुवातीला बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करताना बांगलादेशने भारतासमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
गोलंदाजीत भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आणि यजमान संघाच्या वरच्या फळीतील सर्वच फलंदाजांना एकापाठोपाठ बाद केले. त्यानंतर मात्र खालच्या फळीतील फलंदाजांनी भारतीय संघाच्या गोलंदाजीला कडवे आव्हान दिले. सामन्याच्या १९व्या षटकात बांगलादेशचे अवघ्या ६९ धावांवरच ६ गडी तंबूत परतले होते. मात्र त्यानंतर महमुदुल्लाह आणि मेहदी हसन यांनी संघाला सावरले आणि १४८ धावांची भागीदारी रचली. बांगलादेश संघ आता लवकरच सर्वबाद होईल असे वाटत असताना या दोन फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीच्या बळावर यजमान संघ मजबूत स्थितीत पोहोचला.
महमुदुल्लाह याने ९६ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ७७ धावांची खेळी खेळली तर मेहदी हसन याने ८३ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी खेळली. त्यामुळे यजमान संघाने ५० षटकांत ७ गडी गमावून २७१ धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरने दमदार कामगिरी करत १० षटकांत ३७ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. तसेच मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
Innings Break!
Bangladesh post a total of 271/7 on the board.
Three wickets for Washington and two wickets apiece for Umran Malik and Siraj.
Scorecard – https://t.co/e8tBEGspdJ #BANvIND pic.twitter.com/B1hyZOdMas
— BCCI (@BCCI) December 7, 2022
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला क्षेत्ररक्षणादरम्यान हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याच्या जागी शिखर धवनसोबत विराट कोहली सलामीला मैदानात उतरला आहे. रोहित शर्मा संपूर्ण डावात खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाची आता दुकेदुखी वाढली असून फलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे शिखर धवन आणि विराट यांच्यावर आली आहे.