नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते भारतविरोधी वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांना काही दिवस परदेशात जाण्यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसातील लेखाजोखा मांडला. त्यावेळी बोलताना त्यांनी आमदार संजय गायकवाड किंवा खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आपण समर्थन करत नाही. परंतु, राहुल गांधी यांनी देखील सांभाळून बोलावे, असे बावनकुळे म्हणाले.
जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले आहे. त्यामुळे राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा, असे खडसावून विचारू, असेही बावनकुळे यांनी जाहीर केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री बनण्याआधी आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करतानाच त्यांनी महाराष्ट्रात चुकून कॉंग्रेसचे सरकार आल्यास केंद्र सरकारच्या योजना बंद केल्या जातील, अशी भीती व्यक्त केली.