येरवडा – करोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कैद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईक आणि वकिलांना बुधवार (दि.18) पासून मुलाखत बंद करण्यात आली असल्याचे येरवडा कारागृह अधिक्षक यु.टी.पवार यांनी सांगितले.
करोना प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व स्तरावर उपाययोजना केल्या जात असून कारागृहातील अधिकारी, कर्मचारी तसेच कैदी या सर्वांना मास्क देण्यात आले आहेत तसेच त्यांच्या स्वछतेकडेही लक्ष ठेवले जात आहे.
कैद्यांना भेटण्यासाठी राज्यातून, परराज्यातून नातेवाईक येत असतात त्यामुळे कारागृह परिसरात गर्दी होते. काही विदेशी नागरिकही यात असतात त्यातूनच करोना विषाणूचा प्रभाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कैद्यांच्या नातेवाईकांना भेट नाकारण्यात आली असून मुलाखतीचा कक्ष हा निर्जुंतीकीकरण करण्यात आल्याचे येरवडा कारागृह अधिक्षक पवार यांनी सांगितले.