नवी दिल्ली – दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज, प्रतिमा किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे त्यांच्याशी साम्य दर्शवणाऱ्या कोणत्याही वैशिष्ट्याचा अनधिकृत वापर करण्यास प्रतिबंध करणारा अंतरिम आदेश जारी केला आहे. केबीसी लॉटरीसह अनेक संस्था आणि व्यक्ती आपल्या वलयाचा दुरूपयोग करीत आहेत, असा दावा त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील याचिकेत केला आहे. त्या अनुषंगाने कोर्टाने हा अंतरिम आदेश दिला आहे.
न्यायमूर्ती नवीन चावला म्हणाले की, बच्चन हे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे हे निर्विवाद आहे आणि या टप्प्यावर त्यांना दिलासा न मिळाल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान आणि बदनामी होण्याची शक्यता आहे. बच्चन यांच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी सामग्री प्रसिद्ध करणाऱ्या वेबसाइट्सवरील हा तपशील काढून टाकण्याचा आदेशही कोर्टाने दूरसंचार विभागाला दिला आहे. या आदेशाचा उल्लंघन करणारे टेलिफोन नंबर्सही बंद करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.