नगर जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी

नगर -जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. जिल्ह्यात एप्रिलमध्ये 30 लाख 41 हजार 22 मे.टन चारा शिल्लक होता. तो अंदाजे तीन महिने आठ दिवस पुरेल एवढा असल्याने चाराटंचाई जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी करण्याची मागणी पशुसंवर्धन विभागाने केली होती. त्यानुसार आज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी घातल्याचा आदेश काढला आहे. हा आदेश काढण्यापासून पुढील दोन महिने याची अंमलबजावणी करण्याचे म्हटले आहे.
जिल्ह्यात लहान, मोठे सर्व प्रकारचे एकूण 30 लाख 79 हजार 461 पशुधन आहे. त्यांना प्रति महिना 7 लाख 90 हजार 902 मे. टन चाऱ्याची आवश्यकता भासते. मागील वर्षी 76 लाख 13 हजार 920 मे.टन चार उत्पादन झाले आहे. मार्चपर्यंत 45 लाख 72 हजार 898 मे.टन चारा वापरात आला आहे. एप्रिल महिन्यात 30 लाख 41 हजार 22 मे.टन चारा शिल्लक होता. मात्र पाऊस लांबल्याने हा चारा देखील संपत आला असून जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जिल्ह्याबाहेर चाऱ्याचा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी. ती बंदी ऑक्टोबर महिन्यापर्यंत करावी असा प्रस्ताव पशुसंर्वधन विभागाने दिला होता. त्याबरोबर लिलाव करण्यास देखील परवानगी देण्यात येऊन नये अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गाय व म्हैसवर्गीय मोठी जनावरे 13 लाख 23 हजार 543 आहे. त्यांना प्रतिदिन, प्रत्येकी 15 किलो चारा लागतो तर लहान जनावरांची संख्या 15 लाख 99 हजार 658 आहे त्यांना प्रतिदिन प्रत्येकी 7.5 किलो चाऱ्याची आवश्यकता भासते. शेळ्या-मेंढ्यांची संख्या 14 लाख 79 हजार 803 आहे. त्यांना प्रतिदिन प्रत्येकी 3 किलो चाऱ्याची आवश्यकता भासते.
चारा, मुरघास व टिएमआर या सर्वांची वाहतूक बंदी करण्यात यावी. त्यानुसार आज जिल्हाधिकाऱ्यांनी चार, मुरघास व टोटल मिक्स रेशन (टीएमआर) या सर्वांवर जिल्हाबाहेर वाहतुकीस बंदी घातली आहे. सध्या कमी अधिक झालेल्या पावसामुळे बांदावर व मोकळ्या जागेत गवत उगवत आहे. त्यापासून 13 ते 214 लाख मे.टन चार उपलब्ध होईल, जिल्ह्यात सध्या मुरघास मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहे. किमान 50 हजार मे.टन मुरघास शिल्लक आहे. तसेच वनविभागाकडून चार सुमारे 7 ते 8 मे.टन चार उपलब्ध होईल. परंतू तो होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत चारा वाहतूक बंदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.





