पुणे – करोना काळात रस्त्यांवर गर्दी झाल्यास करोनाची साथ पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे शहरातील गणेशमूर्ती विक्रेत्यांना पदपथ तसेच रस्त्यांकडेला स्टॉल लावण्यास मनाई करण्याचे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालिका प्रशासनास दिले आहेत. शिवाय रस्त्यांवरील स्टॉल तातडीने काढण्याचे आदेश महापालिकेच्या अतिक्रमण विभागास महापौरांनी बुधवारी दिले.
महापौर म्हणाले, ‘शहरातील करोना बाधितांची संख्या आता काही अंशी कमी होऊ लागली आहे. या साथीचा नायनाट करण्यासाठी घरीच गणेशोत्सव साजरा करण्याची विनंती केली असून, पुणेकरांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सोबतच शहरात मूर्ती खरेदीसाठी आलेल्या नागारिकांचा सुरक्षित वावर असावा, विक्रेत्यांनाही चांगली जागा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.
गणेश मूर्ती स्टॉल उभे झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होईलच, शिवाय खरेदीवेळी सोशल डिस्टन्स पाळले जाणार नाही. अशा ठिकाणी एखादा करोनाबाधित असल्यास साथीचा प्रसार आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही विक्रेत्यांना कोणत्याही स्थितीत रस्त्यावर स्टॉल लावून मूर्ती विक्रीस परवानगी दिली जाणार नाही.’
स्टॉल उभे न करण्याच्या निर्णयामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांना जवळच्या पालिका शाळांमध्ये वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यासाठी कोणतेही भाडे आकारले जाणार नाही. मात्र, विक्रेत्यांना 5 हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागणार आहे. शाळा आवारात मैदाने आणि वर्गखोल्या अंतर ठेऊन असल्याने येथे सोशल डिस्टन्सचे नियम पाळले जातील. त्यामुळे शाळांबाबत विक्रेत्यांना माहिती देण्याचे आदेशही पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागास दिले आहेत, असे महापौर म्हणाले.