इस्लामाबाद – पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन रेग्युलेटरी ऍथॉरिटी (पीटीए) ने म्हटले की, सार्वजनिक हिताचा विचार करून प्लेअर अननोन बॅटल ग्राउंड (पब्जी) ला देशात बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
मागील आठवड्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाने (आयएचसी) ऑनलाइन गेम ऍप पब्जीवर पीटीएने घातलेली बंदी उठवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पीटीएने सांगितले की, पाकिस्तानात पब्जीवरील बंदी कायम राहणार आहे.
पीटीएने एक आदेश जारी करून त्यात उल्लेख केला आहे की, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक गुन्हे अधिनियम (पीईसीए) 2016 नुसार या ऑनलाइन गेमवर बंदी घातली आहे. पीटीएने पुढे म्हटले की, इंटरनेट गेमिंग ऍप पब्जी खेळणाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे युवकांमध्ये हिंसेची सवय लागू शकते.
पब्जी गेम लहान मुलांमध्येही विकृती निर्माण करू शकतो. त्याचबरोबर पब्जी गेम खूप वेळपर्यंत खेळला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनाही अभ्यासासाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील आवड कमी होते.