पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : वैभवशाली विसर्जन परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या प्रकाशझोतांचा (लेझर बीम) वापर करण्यात येत आहे. लेझर प्रकाशझोतांमुळे डोळ्यांना इजा पोहोचल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती.
या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर करण्यास बंदी घातली आहे. अन्यथा कारवाईचा इशाराही दिला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात शहरातील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या विसर्जन मिरवणुकीत लेझर प्रकाशझोतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना त्रास झाला. काहींच्या डोळ्यांना इजा झाली.
ध्वनिवर्धकाचाही वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्यानुसार लेझर प्रकाशझोतांवर बंदी घालण्यात आली आहे. मिरवणुकीतील ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पालन करणे गरजेचे आहे.
ध्वनीवर्धक पुरवठादार व्यावसायिकांशी चर्चा करण्यात येणार आहे. लवकरच ध्वनी यंत्रणा सांभाळणाऱ्या (डीजे) तंत्रज्ञांचीही बैठक आयेजित करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्सव काळात वाहतुकीचे नियोजन
शहराच्या मध्य भागात उत्सवाच्या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. फरासखाना- विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक समस्या, वाहनांसाठी जागा (पार्किंग) याबाबत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.
चोरीच्या घटना रोखणे, वाहतूक समस्या, तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पोलिसांनी आतापासून तयारी सुरू केली आहे, असे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
मानाच्या मंडळांची पसंती ढोल पथकांना
मानाच्या मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल- ताशा पथकांनाच पसंती दिली आहे. मानाची मंडळे मिरवणुकीत ध्वनिवर्धकांचा वापर करत नाहीत. पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात येते. बँड, ढोल पथकांचा समावेश मिरवणुकीत असतो, असे मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
मद्यबंदीसाठी पाठपुरावा
उत्सवाच्या कालावधीत पुणे शहरात दहा दिवस मद्यविक्री करण्यास बंदी घालण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केल्या होत्या. मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत असल्याचे पोलीस आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.