वाघेश्वर मंदिराच्या हौदामध्ये सोय : वाघोली ग्रामपंचायत व वाघोली विकास प्रतिष्ठानचे नियोजन
वाघोली- वाघोली व परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी वाघोली ग्रामपंचायत व वाघोली विकास प्रतिष्ठान सज्ज झाले आहे. यावर्षी वाघेश्वर तळ्याच्या शेजारीच बांधलेल्या मोठ्या हौदामध्ये विसर्जनाची सोय केली आहे. वाघेश्वर मंदिर तळ्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्यास बंदी करण्यात आली आहे. वाघेश्वर तळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी हौदामध्ये सर्व मूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व वाघोली विकास प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आली आहे.
वाघोली व परिसरातील घरगुती, सोसायटी व सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीचे वाघेश्वर मंदिराच्या तळ्यामध्ये विसर्जन करण्यात येते. यावर्षी तळ्याचे खोलीकरण केले राहे. तळ्याशेजारी कॉंक्रीटचा विसर्जन हौद बांधला आहे. वाघेश्वर मंदिराच्या बाजूने तळ्यामध्ये प्रवेश करण्यासाठी लोखंडी अँगल लावून बंद केला आहे. तळ्यामध्ये विसर्जन करण्यास बंदी असून हौदामध्ये सर्व गणपतींचे विसर्जन करण्याची सोय केली आहे. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. पाच दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनास सुरुवात होणार आहे. ज्यांना गणेश मूर्ती दान करायची आहे त्यांच्यासाठी सोय केली आहे. निर्माल्य (पूजा साहित्य) कंटेनरमध्ये टाकावे, असे आवाहन केले आहे.
विसर्जनासाठी हौद सज्ज
वाघोली ग्रामपंचायत आणि वाघोली विकास प्रतिष्ठाण गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नियोजन करीत असून 75 फुट लांबी, 56 फुट रुंदी व 17 फुट खोल हौद बांधण्यात आला आहे. सहाशे ते सातशे ब्रास मटेरीअल बसेल एवढी हौदाची क्षमता आहे. पहिल्यांदाच वाघेश्वर तळ्यामध्ये विसर्जन करण्याऐवजी हौदामध्ये मुर्त्यांचे विसर्जन होणार आहे. हौदामध्ये बोटीची सोय देखील करण्यात आली असून विसर्जन हौद सज्ज झाला आहे.
- वाघोलीचे श्रद्धास्थान असलेल्या वाघेश्वर मंदिराच्या तळ्यामध्ये वाघोली व परिसरातील गणेश मूर्तींचे विसर्जन दरवर्षी होत असते. नुकतेच तळ्याचे खोलीकरण करून गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र हौद निर्माण केला आहे. तळ्याचे पावित्र्य राखण्यासाठी पूजा साहित्य निर्माल्य कलशात टाकून हौदामध्ये घरगुती, सार्वजनिक गणेश मंडळांनी हौदामध्ये विसर्जन करावे.
– राजेंद्र सातव, अध्यक्ष, वाघोली विकास प्रतिष्ठान.