नवी दिल्ली – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 16 युट्युब चॅनेलवर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र मंत्रालय आणि सामाजिक व्यवस्थेबद्दल चुकीची माहिती पसरवल्याबद्दल या युट्युब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. या चॅनेलवरून खोटी, अप्रमाणित माहिती पसरवून लोकांमध्ये जातीय तणाव निर्माण केला जात होता, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे. बंदी घालण्यात आलेल्या या16 युट्युब चॅनेलमध्ये 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानी युट्युब चॅनेल आहेत. या सर्व युट्युब चॅनेलच्या माध्यमातून 68 कोटी लोकांपर्यंत संपर्क साधला जात होता.
यापैकी कोणत्याही युट्युब चॅनेलच्या चालकांकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आवश्यक माहिती उपलब्ध केलेली नव्हती. 2021 च्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत ही माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक होते.भारतातील युट्युब चॅनेलच्या माध्यमातून एका समुदायाला दहशतवादी संबोधले जात होते.
विशिष्ट समाजाबद्दल द्वेष भावना पसरवून प्रक्षोभ निर्माण केला जात होता. तसेच प्रवासी कामगारांना घाबरवण्यासाठी करोनाच्या साथीच्या काळात लॉकडाऊनची घोषणा आणि विशिष्ट धर्माच्या लोकांना धमकावण्यासाठी खोटे दावेही केले गेले होते.पाकिस्तानी युट्युब चॅनेलच्या माध्यमातून भारत, भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर आणि भारताच्या परराष्ट्र संबंधाबाबत खोट्या बातम्या प्रसारीत केल्या जात होत्या.