जम्मू : जम्मू काश्मीरमध्ये सोशल मिडीयावरील निर्बंध प्रशासनाने बुधवारी हटवले. त्याबरोबरच 2 जी मोबाईल डाटा सर्व्हिस असलेल्या मोबाईलवर सर्व वेबसाईटना परवानगी देण्यात आली आहे. तसेच वायर इंटरनेटद्वारेही सर्व वेबसाईट पाहणे शक्य होणार आहे. ही सुविधा 17 मार्चपर्यंत असणार आहे.
यापूर्वी 25 जानेवारी रोजी एका आठवड्यासाठी सेवा उपलब्ध केली गेली होती. त्यावेळी केवळ “व्हाईट लीस्ट’ मधील वेबसाईटच बघितल्या जाऊ शकत होत्या. कालांतराने 25 जानेवारीपर्यंतचा कालावधी टप्प्यसटप्प्याने वाढवण्यात आला होता. गेल्या वर्षी 5 ऑगस्टपासून इंटरनेटवरील निर्बंध घालण्यात आल्यापासून नागरिकांना सोशल मिडीयाशी मोबाईलवरून संपर्क साधणे शक्यच झाले नव्हते.
गृहविभागाचे मुख्य सचिव शलिन काबरा यांनी एकंदरीत सुरक्षा परिस्थिती आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हे नवीन आदेश जारी केले. मोबाइल डेटा सेवेची इंटरनेट गती केवळ 2 जी पर्यंत मर्यादित राहील आणि पोस्ट पेड सिम कार्डधारकांना इंटरनेटची उपलब्धता कायम राहील, असे या आदेशात म्हटले आहे.