पणजी – देशातील गोहत्यांचे प्रकार रोखायचे असतील मोदी सरकारने बिफ निर्यातीला बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा अशी सुचना कर्नाटकातील कॉंग्रेस नेत आमदार दिनेश गुंडुराव यांनी केली आहे. गुंडुराव हे कॉंग्रेसचे गोवा शाखेचे निरीक्षक आहेत. आज येथे वार्ताहरांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
ते म्हणाले की, कर्नाटकातील शेतकऱ्यांचे सध्या मोठे हाल सुरू आहेत. सरकारने शेतकऱ्यांना त्यांची जनावरे जगवण्यासाठी कोणतीही मदत केलेली नाही. पण त्याचवेळी शेतकऱ्यांना त्यांची गाय म्हैस बैल अशी जनावरे विकण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा स्थितीत या जनावरांची काळजी कोण घेणार असा सवालही त्यांनी केला.
राज्यातील प्रत्येक जनावरांची काळजी घेणारे धोरण कर्नाटक सरकारने राबवावे अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली. गोहत्या बंदी अनेक ठिकाणी कठोरपणे अंमलात आणली गेल्यानंतर गायींची संख्या वाढण्याऐवजी ती कमीच होताना दिसून येत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बिफच्या संबंधात भाजप दुट्प्पीपणा करीत आहे असा आरोप करून ते म्हणाले की बिफच्या संबंधात गोवा, केरळ आणि ईशान्य भारतात भाजपची एक भाषा असते आणि देशाच्या अन्य भागात त्यांची वेगळीच भाषा असते. केंद्र सरकारला गोहत्यांची एवढीच काळजी असेल तर सरकारने बिफच्या निर्यातीवरच बंदी घालून दाखवावे. भारत हा मोठा बिफ निर्यातदार देश आहे.