धनंजय तानले यांची मागणी
भोसरी – महापुरुषांच्या नावाचा उपयोग करून त्यांचा अवमान करणाऱ्या एकता कपूरच्या अल्ट बालाजी या चित्रपट निर्मिती कंपनीवर सरकारने बंदी घालावी, अशी प्रतिक्रिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ स्मारक व अध्यासन समितीचे सदस्य तथा पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
यासंदर्भात यांनी पोलिस ठाण्यात तक्रारही दिली आहे. जी 5 या यू-ट्यूब चॅनलवरून दाखविण्यात येणाऱ्या विविध मालिकांमधून प्रेम, कामवासना संदर्भात प्रेक्षपण केले जात आहे. या मालिकांमधून गैरप्रकार चालणाऱ्या हॉस्टेलचे नाव अहिल्याबाई लेडिज हॉस्टेल असे दाखविण्यात आले आहे. महापुरुषांच्या नावाचा वापर करून अवमान केल्याबद्दल निर्माते शोभा कपूर, एकता कपूर, दिग्दर्शक साक्षता दळवी व संगीता राव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच संबंधित चॅनल त्वरित बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रसारमाध्यमाद्वारे अशा मालिका दाखविल्याने समाजामध्ये तेड निर्माण होऊ शकते. तसेच महापुरुषांच्या नावाचा असा दुरोपयोग करणे योग्य नाही. ज्यांनी संपूर्ण आयुष्य समाजहितासाठी वेचले त्यांच्या नावाचा अवमान करणे चुकीचे आहे.