कोळकी – मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, “दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 209 व्या जयंतीनिमित्त राज्यातील पत्रकार व पत्रकार संघटनांनी शनिवारी (दि. 20) त्यांना अभिवादन करावे, असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक-अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर व कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी केले आहे.
बेडकिहाळ म्हणाले, राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींची जयंती साजरी करण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत यादीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव समाविष्ट करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केली होती. त्यानुसार ना. पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाला आदेश दिला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2021 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या जपूती2020/प्र.क्र.95/29 च्या परिपत्रकात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
त्यानुसार राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागातील. जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात 20 फेब्रुवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिमेस अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करावा, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून देण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या “महाराष्ट्रातील समाजसुधारक’ या विशेष ग्रंथात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे रंगीत छायाचित्र मुद्रित केले होते. तेच अधिकृत छायाचित्र म्हणून या आदेशासोबत निर्देशित करण्यात आले आहे. मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार सौ. चंद्रकला कदम यांनी हे छायाचित्र तयार केले आहे.