चिंबळी, (वार्ताहर) – लहरी वातावरण आणि ऊन पावसाचा लपंडाव सुरू झाल्यामुळे खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील शेतकर्यांची सोयाबीन काढल्यानंतर मळणीची लगबग सुरू आहे.
सकाळी लवकर जाऊन सोयाबीन काढणे किंवा रात्री चांदण्यात 2 तास सोयाबीन काढून सकाळी 9 नंतर ऊन पडले की सोयाबीन एकत्र करून मळणी करण्याची एकच धडपड शेतकरी व कामगारांची सुरू झालेली खेडच्या दक्षिण भागातील गावागावांत पाहायला मिळत आहे.
कामगारांचा तुटवडा भासत असल्याने जादा रक्कम देऊन सोयाबीन काढणे, मळणी करून सोयाबीन पोती शेतकर्यांच्या घरात टाकणे या पद्धतीचा सर्रास अवलंब केला जात आहे.
काही भागात मळणी झाल्यावर रात्री जेवणाचा बेत आखून त्यावर ताव मारला जात आहे. काढलेल्या सोयाबीनवर जरा पावसाच्या सरी पडल्या तरी ते मऊ पडल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मिळेल त्या ट्रॅक्टर मशीनच्या सहाय्याने मळणी कामात शेतकरीराजा व्यस्त आहे.
बळीराजाने सोयाबीनची तोडणी करून ओळई रचून झाकून ठेवले होते. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ हवामान निर्माण होऊन पावसाचे सावट दिसू लागल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी सोयाबीन पिकाची मळणी करण्यासाठी लगबग करीत आहेत.
एका पोत्यास 450 रुपये दर
सोयाबीनची मळणी करण्यासाठी एका पोत्यास मजूरी धरून 450 रुपये दर घेतला जात असल्याचे बळीराजाने सांगितले.
पण हे सर्व सोपस्कार मिटवून धान्य घरात आल्यानंतर त्याला जर योग्य दर मिळाला नसेल तर बळीराजाचे नुकसान नेहमीप्रमाणे ठरलेले आहे.
त्यामुळे प्रशासनाने सोयाबीन साठी जो हमी भावाची हमी दिली आहे. ती पूर्ण करून शेतकरी राजाला न्याय देण्याची मागणी जोर धरीत आहे.