औंध, दि. 22 (प्रतिनिधी) – स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या बालेवाडीत मागील दोन ते तीन दिवसांपासून बालेवाडी गावठाण परिसरात पाणीच येत नव्हते. अखेर संतप्त ग्रामस्थांनी मनपा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना बालेवाडीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात घेराव घालून कोंडून ठेवले. बुधवारी सायंकाळपर्यंत हे अधिकारी सुटका करून घेण्यासाठी धडपडत होते. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून अधिकाऱ्यांची सुटका केली. दरम्यान, अशी स्थिती उद्भवूनदेखील गुरुवारीदेखील पाणीपुरवठा परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नव्हती.
विस्कळीत पाणीपुरवठ्याबाबत येथील अधिकारी सातत्याने पालिकेकडे तक्रार करत आहेत. परंतु अधिकाऱ्यांकडून दरवेळेस काही ना काही कारणे देण्यात येत आहेत. परंतु पाणीपुरवठा मात्र सुरळीत करण्यात येत नाही. अनेक सोसायट्यांमध्ये तर पाणीच येत नाही. त्यामुळे त्यांची भिस्त टॅंकरवरच आहे.
येथे पाणी आले, तरी फक्त अर्धा तास आणि त्याचीही वेळ नक्की नाही. या समस्येसाठी जुलै महिन्यात या भागातील सर्व नगरसेवकांनी एकत्र येत महापालिका आयुक्त विक्रम कुमार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयचे सहायक आयुक्त संदीप खलाटे तसेच पाणीपुरवठा अधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन ही समस्या मांडली होती. यावर फक्त आश्वासने देण्यात आली. दरम्यान, सतत पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी बालेवाडीचे नागरिक व मनपा पाणीपुरवठा अधिकारी यांची बैठक आयोजित केले होती.
यावेळी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये कोंडून ठेवले. यामध्ये पाणीपुरवठा अधिकारी एकनाथ गाडेकर, श्रीधर कामत, अशोक सांगडे, लाइनमन भाऊराव पाटोळे आणि एल अँड टी कंपनीच्या एका अधिकाऱ्याचा समावेश होता.
गेल्या अनेक दिवसापासून बालेवाडी परिसरामध्ये पाण्याची समस्या जाणवत आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दरवेळेस वेगवेगळी कारणे सांगण्यात येत होती. संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना मंदिरामध्ये कोंडून रोष व्यक्त केला. आता तरी अधिकारी गांभीर्य ओळखून पाणीपुरवठा सुरळीत करतील अशी अपेक्षा आहे.
– अमोल बालवडकर, माजी नगरसेवक
बालेवाडी गावठाण परिसरात दोन-तीन दिवस पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने या भागातील संतप्त नागरिकांनी आमच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. मंदिरात कोंडून ठेवले होते. बालेवाडी परिसरातील पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येईल.
– प्रसन्न जोशी, अधीक्षक अभियंता, चतु:शृंगी पाणीपुरवठा विभाग,