जळगाव – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर शिंदे गटाने ठाकरे गटाला शह देण्यासाठी जणू कंबरच कसली आहे. जळगावात शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांनी आणि पदाधारिकाऱ्यांनी ‘बाळासाहेबांच्या शिवसेनेत’ प्रवेश केला. यावेळी बोलताना बाळासाहेबांची शिवसेना जळगावात नंबर वन करणार असल्याचा निर्धार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत मनसे,राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकदा आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. या कार्यकर्त्यांमुळे पक्षाला आणखी बळ मिळणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर जळगावात ठाकरे गटासह महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण जळगावात ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नंबर वन करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून पक्ष वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिंदे गटासाठी ही पक्षबांधणी महत्वाची ठरणार आहे.