राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणार : बाळासाहेब थोरात

संगमनेर – भाजप व शिवसेनेने मागील पंधरा दिवसांमध्ये 220 जागा यावर बोलण्याचे सोडले असून, त्यांना पराभव दिसत आहे. या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्या भूलथापांना कंटाळली असल्याने यावेळेस कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मुख्यमंत्री आघाडीचाच होईल, असा ठाम विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

जोर्वे येथे मतदान केल्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आमदार थोरात म्हणाले, सरकारने मागील पाच वर्षांत पूर्णत: भ्रमनिरास केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भावनिक मुद्‌द्‌यांना यावेळेस जनता बळी पडणार नसल्याने त्यांचा पराभव अटळ आहे. राज्यातील फसलेली कर्जमाफी, बंद पडत चाललेली कारखानदारी, वाढलेली बेरोजगारी यावर न बोलता 370 सारखे भावनिक मुद्दे करून राजकारण करण्याचा भाजपने प्रयत्न केला.

मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. कॉंग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष असून, तो आता नव्या जोमाने उभा राहिला आहे. ज्यांनी कॉंग्रेस सोडली त्यांच्या जागेवर नवीन तरुण तयार झाले आहेत. त्यामुळे नवी कॉंग्रेस आगामी काळात दिसणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल करुन भाजप-सेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान डिवचला होता. हे भावले नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्र हा सरकारच्या विरोधात आहे. कॉंग्रेस आघाडी मोठ्या मताधिक्‍याने निवडून येणार आहे आणि कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे, असा विश्‍वास व्यक्त करताना ज्यांनी पक्ष सोडला, त्यांनी आता कॉंग्रेसची काळजी करू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)