Maharashtra Assembly Elections 2024 – महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. महायुतीचे जागा वाटपाचे गणित जवळपास पक्के झाले आहे. पण महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात ताणाताणीमुळे जागा वाटपाचे गणित सध्या सुटत नसल्याचे दिसत आहे.
तसेच महाविकास आघाडीमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी आता बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. तसेच तिढा असलेल्या जागांवर लवकरच तोडगा निघेल, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
आज शरद पवारांची भेट घेतल्यानंतर आमच्यामध्ये तासभर खूप चांगली चर्चा झालेली आहे. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाला आग्रह धरण्याचा अधिकार आहे, तो प्रत्येक पक्षाला असतो. तसेच तिढा असलेल्या जागांवर आम्ही लवकरच मार्ग काढणार आहोत.
यासंबंधी उद्धव ठाकरेंसोबत आता चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही, आमच्यामध्ये केवळ चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीची लवकरच पहिली यादी जाहीर करण्यावर चर्चा देखील सुरू आहे. तसेच मला समन्वय म्हणून नेमणे हा पक्षाचा सामुहिक निर्णय आहे. मविआच्या सर्वच पक्षाकडे तुल्यबळ आहे, असेही ते म्हणाले आहेत.
तसेच यावेळी त्यांनी महायुतीवर देखील सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, महायुतीची परिस्थिती आणखी वाईट आहे, मात्र ती फक्त बंद खोलीत असते, बाहेर येत नाही. तसेच महाविकास आघाडीमध्ये गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी भारतीय जनता पक्षाकडून अनेक खोट्या गोष्टी पेरल्या जात आहेत.
त्याकडे दुर्लक्ष करावे. सत्ताधाऱ्यांना वाटते की पैशांच्या जोरावर ते निवडणूक जिंकतील, मात्र जनता आता शहाणी झाली आहे. या सरकारने दोन वर्षात मंत्रालय भ्रष्टाचाराचे केंद्र बनवले असल्याचे देखील यावेळी ते म्हणाले आहेत.