बाळासाहेब नाहाटांना अटक; सासवड न्यायालयासमोर केले हजर

श्रीगोंदा: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांना श्रीगोंदा पोलिसांनी मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास लोणीव्यंकनाथ येथील राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली. धनादेश न वठल्याप्रकरणी नाहाटा यांच्यावर सासवड येथील न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीस वेळोवेळी गैरहजर राहिल्याने त्यांना गैरजमानती पकड वॉरंट बजावण्यात आले होते.

याबाबत सविस्तर असे की, प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा यांच्यावर धनादेश न वठल्याप्रकरणी सासवड येथील न्यायालयात खटला सुरू आहे. याप्रकरणी अनेकदा समन्स बजावून देखील नाहाटा न्यायालयात हजर झाले नाहीत. अखेर सासवड न्यायालयाने गैरजमानती पकड वॉरंट बजावून नाहाटा यांना अटक करून सासवड न्यायालयात हजर करण्याचे आदेश श्रीगोंदा पोलिसांना देण्यात आले होते. त्यानुसार श्रीगोंदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नाहाटा यांनी संबंधित व्यक्तीला दिलेला धनादेश हा जवळपास एक कोटीपेक्षा अधिक रकमेचा असल्याची माहिती समजते. मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नाहाटा हे राहत्या घरी झोपले असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर, पो.कॉ. प्रकाश वाघ, पो. कॉ. दादासाहेब टाके, पो. कॉ. संभाजी वाबळे, पो. कॉ. खरतोडे, चालक किसन औटी या पथकाने त्यांना अटक केली आहे.

दरम्यान, मंगळवारी दुपारी चार वाजता नाहाटा यांना सासवड न्यायालयात हजर करण्यात आले, मात्र त्याबाबत अधिक तपशील समजू शकला नाही. नाहाटा यांच्याविरुद्ध अन्य ठिकाणी देखील वॉरंट बजावण्यात आले आहेत, मात्र वेळोवेळी राजकीय वरदहस्त लाभल्याने ते अनेकदा पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले होते. अखेर नाहाटा हे पोलिसांच्या हाती लागल्याने यांच्यावर आता काय कारवाई होते, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.