न्हावरे -दहिवडी (ता. शिरुर) येथील तेवीस वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती न्हावरे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी विशाल कराळे यांनी दिली.
संबंधित महिला ही ससून रुग्णालय येथेच प्रसूत झाली; मात्र तिच्या नवजात बाळाचा करोना चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आला नसल्यामुळे त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी (दि. 23) या महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान त्याच दिवशी तिला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. 23 मेला संबंधित महिलेच्या प्रसुतीवेळी करण्यात आलेल्या उपचारादरम्यान व नंतर तिचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यानंतर स्वॅब तपासणी अहवालामधून ही महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे रात्री (दि. 28) उशिरा समजले. दहिवडीत आरोग्य विभाग आणि तालुका प्रशासन सतर्क झाले असून, सरपंच संतोष दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
पती बेपत्ता
करोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान तिच्या समवेत असलेला तिचा पती गेल्या दोन दिवसापासून ससून येथून बेपत्ता झाला असल्याने प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली असून, संबंधित महिलेच्या पतीचा शोध प्रशासनाकडून सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.