पुणे – स्पोर्टस्फिल्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत 10 संघ सहभागी होत असून स्पर्धेत दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचा प्रारंभ येत्या शनिवार, 23 ऑक्टोबरला लिजंडस क्रिकेट मैदान, मुंढवा येथे होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्टस्फिल्डस् मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, करोनाच्या संकटानंतर सर्वांचेच जीवन पूर्वपदावर येऊ लागले असून युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेला माणिकचंद ऑक्सिरीच यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. या पहिल्या विंटर स्पर्धेत स्थानिक क्रिकेट क्लब आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील 10 संघ झाले आहेत. साखळी व बाद फेरीत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. सामने फक्त शनिवारी व रविवारी होणार आहेत.
पुनित बालन ग्रुप, गेम चेंजर्स, व्हिज्डम क्रिकेट अकादमी, फ्रेंडस् क्रिकेट क्लब, वैकिंज् क्लब, शिरूर जिमखाना क्लब, आर्यन्स् क्रिकेट अकादमी, कल्याण क्रिकेट क्लब, फार्मा इलेव्हन, पुणे सी.ए. संघ या 10 संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे. लाल चेंडूवर होणाऱ्या या स्पर्धेत 45 साखळी सामने होणार आहेत. अंतिम सामना फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
पारितोषिकांची रेलचेल
स्पर्धेतील विजेत्या संघाला 81 हजार रुपये व करंडक तर, उपविजेत्या संघाला 41 हजार रुपये आणि करंडक मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यांना प्रत्येकी 3 हजार रुपये आणि करंडक तर, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू याला 5 हजार रुपये करंडक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.