नवी दिल्ली – भारताचा अनुभवी मल्ल बजरंग पुनियाने जॉर्जियामध्ये सुरू असलेल्या मेदवेद आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने फ्रीस्टाईलच्या 65 किलो गटात ही कामगिरी केली. बजरंगने अंतिम फेरीत इराणच्या पेईमन बिबियेनीवर 2-0 असा विजय मिळविला.
गतवर्षीही या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. या मोसमात त्याने हे चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती.
महिलांमध्ये विनेश फोगटने 53 किलो गटात अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत स्थानिक खेळाडू याफ्रेमेन्काचा 11-0 असा धुव्वा उडविला. तिच्यापुढे अंतिम फेरीत रशियाच्या एन.मलिशेव्हाचे आव्हान असणार आहे. विनेशने या मोसमात आतापर्यंत तीन सुवर्णपदके जिंकली आहेत.