बजरंग पुनियाची ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली – आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाची राजीव गांधी “खेलरत्न” पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या सन्मानासाठी आपली शिफारस योग्यच असून पुरस्कार मिळाला नाही तर न्यायालयात जाण्याचीहे धमकी त्याने दिली आहे.

देशाच्या क्रीडा क्षेत्रातील हा सर्वोच्च सन्मान मानला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ख्याती मिळविलेले मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी दिनांक 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार विजेत्याची निवड करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश मुकुंदम शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांच्या समितीने एकमताने बजरंगची शिफारस केली.

या समितीमध्ये ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेती बॉक्‍सर एम.सी.मेरी कोम, फुटबॉलपटू बायचुंग भूतिया यांचा समावेश आहे. या समितीस अर्जुन, द्रोणाचार्य आदी अन्य राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याची निवड करण्याचीही जबाबदारी आहे. आज या विजेत्यांच्या नावांची शिफारस केली जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून त्यावर अंतिम मोहोर लावली जाणार आहे.

माझी शिफारस योग्यच, अन्यथा न्यायालयात जाईन- बजरंग

मी कधी पुरस्कारासाठी खेळलेलो नाही. आजपर्यंत मी कायमच देशासाठी सर्वोत्तम यश मिळविण्यासाठी कष्ट केले आहेत. मात्र काही वेळा आपल्या कामगिरीपेक्षा कमी दर्जाची कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळेच मी आता या सन्मानासाठी आग्रही आहे असे बजरंगने सांगितले. त्याने गतवर्षी जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील 65 किलो गटात सुवर्णपदक मिळविले होते. त्याच वर्षी त्याने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सोनेरी कामगिरी केली होती. त्याने 2013 मध्ये जागतिक स्पर्धेतील 60 किलो गटात ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. गतवर्षी याच स्पर्धेत त्याला रौप्यपदक मिळाले होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×