पिंपरी: भाजी मंडईमध्ये होणारी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील 7 भाजी मंडई बंद केल्या. त्याऐवजी मोकळ्या मैदानांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एकूण 9 ठिकाणी संबंधित केंद्र सुरू केले आहेत.
महापालिकेच्या पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, वाकड, भोसरी आणि थेरगाव येथील बंदिस्त भाजी मंडई पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येतील, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे. भाजी मंडई बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरात प्राथमिक स्तरावर एकूण 46 ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 9 केंद्र हे कार्यान्वित झाले आहेत. संबंधित केंद्रांमध्ये सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत भाजी विक्री केली जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी गुरुवारी फळे व भाजीपाला विक्री केंद्रांसाठी मोरवाडी, भोसरी, मोशी, किवळ येथील निवडलेल्या जागांची पाहणी केली. तर, शुक्रवारी कासारवाडी, सांगवी, थेरगाव, ताथवडे येथील जागांची पाहणी केली आहे.
महापालिकेने पहिल्या टप्प्यात सुरू केलेले केंद्र : 1) नियोजित महापौर निवासस्थान मोकळे मैदान, सिटी प्राईड शाळेशेजारी, प्राधिकरण. 2) तालेरा ग्राऊंड, केशवनगर, चिंचवड. 3) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी 4) गावजत्रा मैदान, भोसरी 5) सीडीसीसी ग्राऊंड, शनि मंदिरासमोर, पूर्णानगर, चिखली 6) अण्णाभाऊ साठे अभ्यासिका केंद्र, यमुनानगर 7) कैलास मंगल कार्यालय, थेरगाव 8) सर्व्हे क्रमांक 628, वनदेवनगर, थेरगाव 9) पीडब्ल्युडी मैदान, सांगवी.
महापालिकेने नव्याने सुरू केलेल्या फळे व भाजीपाला केंद्रातच नागरिकांनी भाजी व फळे विकत घ्यावी. तेथे अधिकृत व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजणे, सॅनिटायझर तसेच प्रत्येकाची नोंद ठेवली जात आहे. त्याशिवाय, भाजी विक्रेत्यांच्या शरीराचे तापमान देखील मोजले जात आहे.
– नामदेव ढाके, सत्तारुढ पक्षनेते.