बेंदूर सणाच्या निमित्ताने…..

File photo

आपला देश जगभरात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशाची अर्थव्यवस्थाही शेती व शेतीपूरक उद्योगांवर अवलंबून आहे. पुरातन काळापासून शेती, शेतकरी व बैल असे समीकरण रुजलेले आहे. शेती करण्यासाठी बैल हा महत्त्वाचा घटक समजला जातो. नांगरणी, पेरणी ते मळणीपर्यंत बैलांचा शेतीत खूप मोठा सहभाग असतो. वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता म्हणून पुरातन काळापासून बेंदूर हा सण साजरा केला जातो.

आषाढी एकादशीनंतर दोन दिवसांनी बेंदूर सण साजरा केला जातो. पश्चिम महाराष्ट्रात बेंदूर, तर उर्वरित महाराष्ट्रात बैलपोळा या नावाने हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर बळीराजाला शेतीच्या कामात अतोनात सहाय्य करणाऱ्या मुक्या जनावरांना यादिवशी कामातून विश्रांती मिळते.

यादिवशी बैलाचा थाट राजेशाही असतो. सकाळी बैलांना गरम व थंड पाण्याने आंघोळ घातली जाते. शिंगांना हिंगूळ हा रंग लावला जातो. संपूर्ण अंगावर विविध रंगांच्या माध्यमातून कलाकृती काढून त्याला सजवले जाते. अंगावर रेशमाची झुल चढवली जाते. गळ्यात व पायात चाळ बांधून शिंगावर फुगे, हार बांधले जातात. तसेच अंगावर झूल टाकून जनावरांना सजवले जाते. गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. बेंदूर दिवशी बैल हा प्राणी नसून तो आपल्यापैकीच एक आहे, अशी भावना शेतकऱ्यांची असते. ग्रामदैवताचे दर्शन झाल्यानंतर जनावरांची घरी पूजा करुन गुळ पोळीचा नैवेद्य भरविण्यात येतो. जे शहरात राहतात, त्यांचा शेतीशी काहीही संबंध येत नाही. असे लोकही अन्नदाता असलेल्या बैलाबाबत कृतज्ञता म्हणून मातीच्या बैलाची घरामध्ये प्रतिष्ठापना करुन त्यांची विधीवत पूजा केली जाते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बैल हा कृषक समाजाशी निगडीत प्राणी आहे. पुरातन काळापासून पारंपारीक शेतीमध्ये बैलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंकराच्या देवळात जाताना नंदीचे दर्शन आधी घेतले जाते. सिंधुसंस्कृतीच्या मुद्रेवरही बैल आढळतो आणि उत्खननात सापडलेल्या खेळण्यात ही बैलगाडी आहे. बैलाची विविध रूपे माणसाने आजवर पाहिली. परंतू, कालपरत्वे शेतीमध्ये यांत्रिकीकरण आले. यांत्रिकीकरणाच्या युगात हळूहळू नामशेष होणारा बैल आणि त्याचे हजारो वर्षांचे योगदान आपण दुर्लक्षित करतो आहोत का? हा प्रश्न पडला आहे. बैलाच्या श्रमाला ट्रॅक्टर सारखे पर्याय आले. कदाचित काही वर्षांनी बैल आणि आपल्या अनेक पिढ्यांना पोसणारी त्याची मेहनतही काळाच्या पडद्याआड जाईल. तरीही आजही खेडोपाड्यात बैलाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)