पुणे : पुणे शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत 2 कोटी रुपयांची खंडणी आणि काही कोटी रुपयांची जागा नावावर करुन देण्याची मागणी केल्याप्रकरणात महिलेसह स्वयंघोषित पत्रकार आणि निलंबित पोलिसाला न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने कोथरूड पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर महिलेतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे, निलंबीत पोलीस कर्मचारी शौलेश हरिभाऊ जगताप (रा.भवानी पेठ) याच्यातर्फे ऍड. प्रसाद कुलकर्णी आणि स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (रा.प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड) याच्यातर्फे ऍड. प्रताप परदेशी यांनी जामिनासाठी अर्ज केला.
त्यावर तपासास सहकार्य करणे आणि भारत देश न सोडण्याच्या अटीवर न्यायालयाने हा आदेश दिला. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे आणि अमोल सतिश चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरुड) या दोघांवर गुन्हा दाखल आहे. बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.