पुणे – माहिती अधिकार कार्यकर्त रविंद्र बऱ्हाटे याला मदत केल्याप्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या त्याचा मुलगा, पत्नी आणि वकिलाला न्यायालयाने पंधरा हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. विशेष न्यायाधीश एस.आर. नावंदर यांनी हा आदेश दिला आहे.
तिघांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू होत नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा आदेश दिला आहे. रवींद्र बऱ्हाटेचा मुलगा मयुर, पत्नी संगिता (वय.49,रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (49) अशी जामीन झालेल्या तिघांची नावे आहेत. वकील मोरे याच्यातर्फेअॅड. राजेंद्र दौंडकर आणि ऍड. तुषार चव्हाण यांनी, तर मुलगा आणि पत्नीच्या वतीने अॅड. तुषार चव्हाण यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
जमिनीच्या व्यवहारात अनेकांना आर्थिक गंडा घातल्याचा आरोप असलेला रवींद्र बऱ्हाटे सुमारे दीड वर्षाच्या कालावधी फरार होता. त्याच्यावर मोक्का लावण्यात आला होता. त्याला व्हिडीओ अपडेट करणे, फरार होण्यास मदत केल्याचा आरोप तिघांवर होता.
मुलगा, पत्नी आणि वकिलाने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने मंजुर केला. दरम्यान पोलिसांनी रवींद्र बऱ्हाटेला अटक केली आहे. तो पोलीस कोठडीत आहे.