पुणे : लॉकडाऊनमध्ये द्रुतगती मार्गावरून जाणाऱ्या वाहनांना सोडण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकास विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. सत्यजित रामचंंद्र अधटराव असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. सुहास कोल्हे आणि ऍड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. याप्रकरणी महेंद्र रामजीत यादव (वय ४१) या व्यक्तीने लाचलुचपत विभाकडे तक्रार दिली होती.
ही घटना उर्से टोलनाका परिसरात बुधवारी (दि. 29) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली. यादव हे त्यांच्या गाडीतून पवनचक्कीचे पाते घेऊन चेेन्नईहून राजकोटकडे जात होते. यावेळी अधटराव यांनी यादव व त्यांचे सहकारी यांची दोन वाहने टोलनाक्यावर अडवून ठेवली. ही दोन्ही वाहने लॉककडाऊन उठल्यानंतर (३ मे) सोडली जातील, असे अधटराव याने यादव यांना सांगितले. दोन्ही गाड्या लगेच सोडायच्या असतील तर प्रत्येक गाडीचे १० हजार असे एकूण 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.
दरम्यान, याबाबत यादव यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार अधटराव याला अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावेळी त्याने ऍड. सुहास कोल्हे आणि ऍड. राहुल भरेकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.