पुणे – कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून सत्तुर आणि कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात आणि खांद्यावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला 25 हजाराचा जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. अदोने यांनी हा आदेश दिला.
रजत हिरामण दगडे (वय 20 रा. बावधन बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. ऋषीकेश सुभेदार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची भावजी गणेश ऊर्फ निमितीश दिलीप शेडगे (वय 25, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
विजय शिवाजी येनपुरे (वय 39, रा. भुगाव, ता. मुळशी) याने याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 29 डिसेंबर 2020 रोजी भूगाव येथे घडली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या अश्वजीत पवळ यालाही मारहाण करण्यात आली आहे. शेडगे याच्या गोठ्यातून कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून ही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात दगडे याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याची परीक्षा आहे. वादात त्याचा सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा न सापडल्याने त्याला जमीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली.