पुणे : जुन्या भांडणावरून खुन्नस असलेल्या व्यक्तीसोबत फिरत असल्याने कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात न्यायालयाने एकाला 30 हजारांचा जामीन मंजुर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याच्या अटीवर सत्र न्यायाधीश एस.जी.वेदपाठक यांनी हा आदेश दिला आहे.
सौरभ अण्णा नेटके असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. श्रीकृष्ण घुगे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. घुगे यांना ऍड. सचिन जगताप यांनी सहाय्य केले. ही घटना 8 मे 2021 रोजी घडली. याबाबत आशिष उंद्रे (रा. मांजरी खुर्द) याने फिर्याद दिली आहे.
विकास सोनवणे हा उंद्रे याचा लहानपणापासूनचा मित्र आहे. विकास आणि सौरभ यांच्या जुन्या भांडणावरून खुन्नस आहे. फिर्यादी विकाससोबत फिरतो, या कारणावरून सौरभ याच्यासह तिघांनी मारहाण केली. सौरभ याने डोक्यावर कायत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी सौरभ न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. श्रीकृष्ण घुगे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.