पुणे – प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी अटक केलेल्या कालिचरण महाराज यांना न्यायालयाने 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे या आणि अशा अटींवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांनी हा आदेश दिला आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. अमोल डांगे यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर कालिचरण यांनी गुरूवारी (दि. 6) जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सरकार पक्षातर्फे पोलीस व सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार असून, कालिचरण यांना जामीन झाल्यास या आरोपींना मदत होईल. त्यामुळे जामीन नाकारण्यात यावा, असे म्हणणे सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी सादर केले. तर तपास पूर्ण झाला आहे. त्यांच्याकडून काहीही जप्त करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे ऍड. अमोल डांगे यांनी केली.
समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे 19 डिसेंबर 2021 रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर आयोजित शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कालिचरण महाराजाला जयपूरवरून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.