पुणे – शाहरून खान पुत्र आर्यन आरोपी असलेल्या क्रुझवरील अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीचा पंच असलेल्या किरण गोसावीसोबत गुन्हा दाखल असलेल्या महिलेला लष्कर आणि फरासखाना येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. कुसुम संदीप गायकवाड (रा. कॅम्प) असे तिचे नाव आहे. तिने दोन्ही प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना ऍड. जितेंद्र सावंत, ऍड. राहुल भरेकर, ऍड. संग्राम काटे आणि ऍड. वैभव मेदणकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तर तिला एका प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
तरुणांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याच्यावर लष्कर आणि फरासखाना पोलिसात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल आहे. लष्कर पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत शिवराज रामचंद्र जमादार ( रा. देवाची उरुळी) यांनी फिर्याद दिली आहे. गोसावी आणि गायकवाड यांनी मिळून फिर्यादी यांच्यासह आठ जणांची परदेशात नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याचे तपासातून समोर आले आहे. तर मेट्रोपोल हॉटेल मलेशिया येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून वेगवेगळ्या कारणांसाठी तीन लाख नऊ हजार रुपये घेत फसवणूक केली आहे.
या प्रकरणी चिन्मय श्रीधर देशमुख (रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असताना तिने ऍड. जितेंद्र सावंत, ऍड. राहुल भरेकर, ऍड. संग्राम काटे आणि ऍड. वैभव मेदणकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी करत लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.देशपांडे यांनी, तर फरासखाना प्रकरणत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी हा आदेश दिला आहे.