85 विदेशी तबलिगींना जामीन मंजूर

नवी दिल्ली: दिल्लीतील न्यायालयाने किरगिझीस्तानचे नागरिक असलेल्या 85 तबलिगींना आज जामीन मंजूर केला. व्हिसा निकषांचे उल्लंघन करून धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग आणि कोविड-19 च्या साथीच्या पार्श्‍वभुमीवर सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्याबद्दल त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

मुख्य महानगर दंडाधिकारी गौमोहिना कौर यांनी प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या हमीवर या सर्वांना जामीन मंजूर केला. आतापर्यंत या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या 34 देशांमधील 532 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांनी जून महिन्यात 59 आरोपपत्रे दाखल केली आहेत. त्यामध्ये 956 विदेशी नागरिकांविरुद्धच्या पुरवणी आरोपपत्रांचाही समावेश आहे. हे सर्व विदेशी नागरिक 36 वेगवेगळ्या देशातील नागरिक आहेत.

ज्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. ते उद्या आपला गुन्हा कबूल करतील. त्यामुळे त्यांना कमी शिक्षा होण्याची शक्‍यता आहे. आजच्या सुनावणीदरम्यान या आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते.

मार्च महिन्यात दिल्लीत निझामुद्दीन भागात झालेल्या मरकझ या धार्मिक समारोहाला हे सर्वजण लॉकडाऊनच्या नियमांचा भंग करून उपस्थित राहिले होते. त्यांच्या एकत्रीकरणामुळे करोनाची साथ वाढली होती. या सर्वांना 6 महिने ते 8 वर्षांपर्यंतची शिक्षा होण्याची शक्‍यता आहे.

या सर्वांचे व्हिसा रद्द करण्यात आले असून त्यांना काळ्या यादीत टाकले गेले आहे. त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नसून ते दिल्ली उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. निझामुद्दीनमधील मरकझमध्ये 9 हजार जण सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.