पुणे : मोबाईलवर कॉल करून नाकाबंदीसाठी हजर राहण्यासाठी सांगितल्यावरून हवालदाराला गज, तसेच लाथा मारून जखमी करणाऱ्या पोलीस शिपायाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे आणि तपासास सहकार्य करण्याच्या अटीवर प्रथमवर्ग अधिकारी डी. ए. दरवेशी यांनी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा आदेश दिला आहे.
सुरज जालिंदर पोवार असे जामीन मिळालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याने ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. अभिजित सोलनकर आणि ऍड. अक्षय वाडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्याविरोधात पोलीस हवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पोलिसात गुन्हा दाखल आहे. ही घटना दापोडीतील हॅरीस पूलावर 22 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
कोविड 19 प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. पोलीस मुख्यालयात नेमुणकीस असलेले पोलीस हवालदार यांना भोसरी पोलीस ठाणे अंतर्गत बंदोबस्तासाठी दापोडीतील हॅरीस पूल येथे नाकाबंदी पॉईंटवर नेमण्यात आले होते. याच ठिकाणी पोवार यालाही नाकाबंदीसाठी नेमले होते. पोवार हा 22 एप्रिल रोजी रात्री साडेदहा पर्यंत बंदोबस्तासाठी न आल्याने फिर्यादींनी त्याला कॉल केला तसेच बंदोबस्तासाठी येण्याबाबत सांगितले त्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या डाव्या पायावर गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.