डॉ. तावडे, भावे यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण

 

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि विक्रम भावे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज येथील विशेष न्यायालयाने पुन्हा फेटाळला. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून डॉ. तावडे याने तिसऱ्यांदा, तर भावे याने दुसऱ्यांदा अर्ज केला होता.

भावे याचा यापूर्वी सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अर्ज करणे गरजेचे आहे. जामिनावर असताना त्याने हा गुन्हा केला आहे. प्रथमदर्शनी त्याच्याविरोधात पुरावे आहेत. भावेने घटनास्थळाची रेकी केली, असे इतर आरोपींनी कबूल केले आहे. डॉ. तावडे हा कॉ. पानसरे हत्याप्रकरणात आरोपी आहे. त्याची भूमिका एका साक्षीदाराने विशद केली आहे. तो या गुन्ह्यात मास्टरमाइंड आहे. त्यामुळे दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्‍तिवाद सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केला.

कॉ. पानसरेप्रकरणात डॉ. तावडे यांना जामीन मिळाला आहे. त्या गुन्ह्यात डॉ. तावडे मास्टरमाइंड नाही, असे त्याबाबतच्या आदेशात नमूद आहे. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग दिसून येत नाही. तर शरद कळसकरचा जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार आहे, असा युक्‍तिवाद डॉ. तावडे आणि भावे यांचे वकील समीर पटवर्धन यांनी केला होता.

सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हाच डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील मास्टरमाइंड आहे, असा दाबा सीबीआयकडून करण्यात आला. विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.