पुणे – सासवड येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत ‘पुढे चला’ म्हटल्याच्या रागातून तरुणाला धारदार हत्याराने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाचा जामीन सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटालला.
अतुल अशोक जगताप (वय 36, रा. सासवड पोलिस लाइन समोर) असे जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. 9 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेबाबत त्याच्यासह बारा जणांविरोधात सासवड पोलिसात गुन्हा दाखल आहे. आरोपींच्या मारहाणीत विक्रम उर्फ विकी जगताप (रा. सासवड) जखमी झाला असून, याबाबत त्याच्या भावाने फिर्याद दिली आहे.
सासवडमधील हुंडेकरी चौकात गणपती विसर्जन मिरवणुकीत फिर्यादींच्या भावाने एकाला पुढे चला म्हटले. त्या रागातून त्याने आणि साथीदारांनी कार्यालयात बोलावून घेतले. तिथे जगतापला दमदाटी करत धारदार शस्त्रासह बॅट व काठीने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादींच्या आई व मामीला शिविगाळ केली. , फिर्यादींच्या मामाच्या घराबाहेर उभी असलेल्या चारचाकीची काच दगडाने फोडली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. जगताप याने न्यायालयीन कोठडीत असतना जामिनासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सरकारी वकील संतोषकुमार पताळे यांच्या युक्तीवादानंतर फेटाळला.